*स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर - सुधीर मुनगंटीवार*
*माझ्यातल्या कलेचं संपूर्ण श्रेय भारताच्या परंपरेला - राम सुतार*
*सुधीर मुनगंटीवार आणि मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार*
मुंबई,१५ जानेवारी २०१९-
जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचा ५०हून अधिक संस्थांच्या वतीने मुंबईत जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी श्री राम सुतार यांना सरस्वती देवीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मकर संक्रातीच्या मुहूर्तावर हा सत्कार समारंभ लोढा वर्ल्ड टॉवरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. 'परमवीर'च्या लेखिका श्रीमती मंजू लोढा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विश्व प्रसिद्ध शिल्पकार व पद्मभूषण सुतार यांचा सन्मान करणे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. श्री राम सुतार यांनी जगातली सर्वात मोठी सरदार पटेल यांची मूर्ती बनवून भारताचा गौरव वाढवला आहे. मुनगंटीवार यांनी राम सुतार यांना 'भारताचा कोहिनूर' म्हणत आपल्याला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असल्याचे सांगितले. जगातील सर्वात मोठी मूर्ती निर्माण करणाऱ्या राम सुतार यांचा सत्कार 'वर्ल्ड टॉवर' बिल्डींगमध्ये होत आहे, ही एक अद्भुत गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या सत्कार प्रसंगी पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांनी सरदार पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती आणि आपल्या सर्व रचनांचं श्रेय भारतीय संस्कृती आणि परंपरेला दिलं. या कार्यक्रमात ५०हून अधिक देशातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या.
जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार हे सरळ व सामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. राम सुतार यांचा आमच्या सर्वांच्या हातून सत्कार होत आहे. ही एक विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, असे आमदार मंगल प्रभात लोढा म्हणाले. यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे चेअरमन केवल होंडा आणि राजेंद्र जाधवही व्यासपीठावर उपस्थित होते. लोढा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली डॉ. द्वारकानाथ कोटणीस रिसर्च ब्यूरो आणि लाडले इन्फो यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कला-संस्कृती समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment